top of page

गणपती मंदिर, रेडी

सावंतवाडी पासून ३३ कि.मी. अंतरावर व वेंगुर्ले पासून २४ कि.मी. अंतरावर असणारं - सुंदर समुद्रकिनार्‍यानं सजलेलं गांव म्हणजे रेडी. पूर्वीपासून मँगनिज खाणींमुळे महाराष्ट्रभर प्रसिद्द असलेले गाव आत्त येथील नवसाला पावणारा स्वयंभू द्विभूज गणेशाच्या मंदिरामुळे नावारुपास आलेलं आहे. येथील गणेशाची ही मूर्ती जमिनीत सुमारे आठ फ़ुटांवर सापडली होती. पूर्वी मँगनिज धातूची येथे जोरदार वाहतूक सुरु असे, खाणीत सापडणारे कच्चे मँगनिज खाणीपासून जेट्टीपर्यंत नेण्यासाठी मोठ्याप्रमाणात ट्रकची वाहतूक होई. या वाहतूक व्यवसायात ट्रकचालक असलेले "श्री. सदानंद कांबळी" यांना १८ एप्रिल १९७६ रोजी पहाटे दृष्टांत झाला. त्या स्वप्नांत श्री गणेशांनी दर्शन देवून ठरविक ठिकाणी माझी मूर्ती आहे, ती जागा मोकळी कर असा आदेश दिला. स्व्प्नांत झालेल्या भासाच्या अनुरोधाने श्री. कांबळी यांनी गावातील काही रहीवाश्यांना घेवून त्या जागेवर खणण्यास सुरुवात केली. दोन दिवसांनंतर त्या मूर्तीचा कानाकडील भाग दिसू लागला. गावची मुख्य देवी श्री माऊलीकडे चौकशी केल्यावर देवीच्या हुकूमाने मूर्ती पूर्ण दिसेपर्यंत जमिनीचा भाग खुला केला. तो पर्यंत मे महिना उजाडला. १ मे १९७६ रोजी संपूर्ण मूर्ती खोदून बाहेर काढण्यात आली.
श्री गणेशाची मूर्ती जांभा दगडावर कोरलेली असून आसनस्थ आहे आणि विशेष म्हणजे ती द्विभुजाकार आहे. ६ फ़ुट उंच आणि साडे चार फ़ुट रुंद अशी ही लंबकर्ण गणेशाची अति दिव्य, देखणी, प्रसन्न, विशाल मूर्ती पाहिल्यावर भाविकांना प्रसन्नता वाटते. सव्वा महिन्यांनी श्री गणेशाचे वाहन असणारी मूषकाची मूर्ती दुसर्‍या एका खाणीत सापडली. ती या गणेश मूर्तीसमोर आणून ठेवण्यात आली.
पुराणकाळात पांडवानी आणि ॠषिमुनींनी अनेक ठिकाणी देवदेवतांच्या मंदिरांची स्थापना केली होती. त्यावेळची ही स्वयंभू गजाननमूर्ती असावी असा जाणकारांचा व अभ्यासकांचा अंदाज आहे.
आता येथे सुंदर मंदिर बांधले आहे. मंदिराच्या सुमारे ३० फ़ुटांवर नितळ, फ़ेसाळणारा समुद्र आहे. येथील सौंदर्य खरचं विलोभनीय आहे. रेडी मध्ये बघण्यासारखे माऊली मंदिर, पर्यटकांना विश्रांती करिता सिद्धेश्वर मंदिर, यशवंतगड व रेडीपासून ७ कि.मी. अंतरावर तेरेखोल, केरी ही पर्यटन स्थळे आहेत
.

© 2023 by NOMAD ON THE ROAD. Proudly created with Wix.com

  • b-facebook
  • Twitter Round
  • Instagram Black Round
bottom of page