भारताचा पश्चिम किनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्यामध्ये असलेला भूमीचा पट्टा महाराष्ट्रात व गोव्यात "कोकण" म्हणून ओळखला जातो. याच पट्ट्याला दक्षिणेत, म्हणजे कर्नाटक व केरळमध्ये "मलबार किनारा" म्हणून ओळखतात. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडं आणि डोंगर उतारांवर केलेली भात शेती... असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच स्थित आहे.
इतिहास
पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णुचा सहावा अवतार असलेल्या श्री परशूरामाने केली. परशूरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्र केल्यावर, त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वत: परशूराम दक्षिण पर्वतांवर निघुन गेले व तेथे त्यांनी शूर्पारक देशाची निर्मीती सागरा पासुन केली असा उल्लेख महाभारताच्या शांतिपर्वात आढळतो.
पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वत:च्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचा निश्चय केला आणि त्या प्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशूरामाच्या बाणाच्या टप्प्या पर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्या प्रमाणे परशूरामाने सह्याद्री वरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्या नंतर परशूराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या गोकर्ण क्षेत्री वास्तव्य करू लागले.
कोकणस्थ ब्राम्हणांची निर्मीती देखिल परशूरामाने केली अशी पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. पण गोमंतकातील (गोव्यातील) गौड सारस्वत व केरळ मधील नंबूथिरी ब्राम्हणांच्या उगमा संदर्भात देखिल याच प्रकारच्या परशूराम कथेवर आधारित आख्यायिका आहेत. कोकणात अनेक ठिकाणी या आख्यायिकेला अनुरूप असे पुरावे सापडतात. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण जवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशूराम क्षेत्र व प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी: .) या गावी एक प्राचीन परशूराम मंदिर आहे.
कोकण विभागाची संरचना
महाराष्ट्राच्या सहा प्रशासकीय विभागांपैकी कोकण विभाग हा एक आहे. या विभागात सहा जिल्हे व ७२० कि.मी लांबीच्या किनारपट्टीचा समावेष होतो.
क्षेत्रफळ: ३०७४६ चौ. कि. मी
कोकणातील जिल्हे:
मुंबई जिल्हा
मुंबई उपनगर जिल्हा
ठाणे जिल्हा
रायगड जिल्हा
रत्नागिरी जिल्हा
सिंधुदुर्ग जिल्हा
प्रमुख भाषा: मराठी, कोकणी, मालवणी