जिल्हा ठाणे:
जिल्हा रायगड:
आनंद गणेश मातृमंदिर,
आनंदनगर (ता. पेण, जि. रायगड)
साभार... (महाराष्ट्र टाइम्स)
गर्द हिरवार्ईत, कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात एकाच वेळी गणराजांसह विविध देवतांचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण होते ती पेण येथील आनंद गणेश मातृमंदिरात. मुंबर्ई - गोवा महामार्गावर पेण शहरापासून जेमतेम चार किलोमीटर अंतरावर रामवाडीत एका छोट्याशा टेकडीवर प्रशस्त सभामंडप आणि असंख्य देवता असणारे हे अप्रतिम मंदिर उभारण्यात आले आहे. आनंद गणेश मातृमंदिर हे गणपती आणि अष्टभुजा श्री संतोषी मातेचे मंदिर आहे. या दोन्ही देवता मंदिरात शेजारी स्थापित करण्यात आल्या आहेत.फुलांच्या ताटव्यातून मंदिरात प्रवेश केल्यावर विष्णू - लक्ष्मी आणि गरुडाची मूर्ती दिसते. छोट्या छोट्या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांमध्ये शंकर- पार्वती, गणपती, विठ्ठल - रुक्मिणी, सिद्धिविनायक, काळभैरव, वेताळ, तिरुपती, रेणूकादेवी, सरस्वती, काली माता व सार्ईबाबा यांची मंदिरे आहेत. मुख्य मंदिरात गणपतीची लोभस व संतोषी मातेची अत्यंत तेजस्वी मूर्ती येथे पाहण्यास मिळते. मंदिरातील गर्भगृहाला सुरेख नक्षीकाम केले असून त्याच्या उजव्या बाजूला श्री लक्ष्मी कमलाक्षणी देवीची मूर्ती आढळते.आठ खांबांच्या आधारावर उभा असलेला गोल घुमटाखालचा प्रशस्त सभामंडप हेसुध्दा आनंद गणेश मातृमंदिराचे खास आकर्षण. या आठही खांबांवर अष्टविनायकाच्या मूर्ती व सभागृहात मोदक हाती असलेला भलामोठा मूषक दिसतो. गोल घुमटाच्या सभागृहात प्रवेश करताच डाव्या हाताला झुलेलाल, ब्राह्मण, ब्राह्मणी, लक्ष्मी- विष्णू, शंकर- पार्वती व नंदी यांच्या मूर्ती दृष्टीस पडतात. तर उजव्या हाताला राधा-कृष्ण, श्री महाप्रभुजी, श्री जनाजी, दत्तात्रेय आणि अष्टभुजेच्या मूर्ती आपले लक्ष वेधून घेतात. तसेच अठरा हात असलेल्या नवदुर्गेच्या समोर तेजस्वी रूपातील शैलपुत्री, ब्रह्माचारिणी, चंद्रघण्टा, कूष्माण्डा, स्कन्यमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी व सिद्धीदात्री अशा नऊ दुर्गा आहेत. या मंदिराच्या आवारात उंच मनोरा आहे. त्यावरून पाहिल्यावर दिसणारा पेण गावाचा हिरवागार परिसर, दूरदूरचे डोंगर आणि लहानशी गावे मन प्रसन्न करतात.

आनंदनगर (ता. पेण, जि. रायगड)