जिल्हा ठाणे:
जिल्हा रायगड:
उपवनातला गणेश,
उपवनातला गणेश, उपवन (जि. ठाणे)
साभार... (महाराष्ट्र टाइम्स)
निसर्गरम्य येऊरच्या पायथ्याशी उपवनचा सुरेख तलाव आहे. हिरवागार डोंगर आणि दुसऱ्या बाजूला हवेवर हेलकावे घेणारे तलावातील पाणी. या तलावालगत गणपतीचे मंदिर आहे. पुर्वी उपवन परिसरात शाळांच्या सहली यायच्या. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे आता उपवनही ठाण्यात दाखल झाले आहे. असे असले तरी या भागाने आपले सौंदर्य आणि शांतता मात्र राखली आहे. त्यामुळेच देवदर्शन आणि दोन घटका निवांत घालविण्यासाठी शेकडो ठाणेकर या भागाला पसंती देतात. ठाणे शहराच्या सौंदर्यामध्ये भर घालण्याचे काम अनेक वर्षांपासून इथले तलाव करत आहेत. यामध्ये उपवन तलावाशी इथल्या गणपती मंदिर निर्मितीच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. तलावाच्या सुशोभिकरणासाठी उत्खनन सुरू असताना एका पडक्या मंदिराचे कोरीव अवशेष सापडले. यामध्ये एका दगडात कोरलेली गणपतीची सुंदर मूर्ती सापडली. ही मूर्ती सापडल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सुरुवातील तलावाच्या शेजारीच एका झाडाच्या पारावर भक्तांच्या दर्शनासाठी मूर्ती ठेवण्यात आली. त्यानंतर रेमंड कंपनीचे संचालक गोपाळकृष्ण सिंघानिया यांनी या जागेवर मंदिर बांधले. या मूर्तीची १९७४ साली प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.आज ठाण्यात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले असले तरी उपवन तलाव परिसरातील नैसर्गिक सौंदर्य अजूनही अबाधित आहे. मंदिराच्या आजूबाजूला असलेली विविध झाडे या मंदिराच्या सौंदर्यामध्ये भर घालतात.

उपवन (ठाणे)