जिल्हा ठाणे:
जिल्हा रायगड:
रिद्धी-सिद्धी विनायक,
विनायक (ता. उरण, जि. रायगड)
साभार... (महाराष्ट्र टाइम्स)
गणपतीच्या मंदिरासाठी राज्यात अनेक गावे - शहरे प्रसिद्ध आहे. पण गणपतीच्या नावाने म्हणजे, खुद्द विनायक अशाच नावाचे गाव रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यातल्या उरण पासून अगदी २ ते ३ किलोमीटर अंतरावर आहे. विनायक गावात श्री सिद्धिबुध्दी श्री विनायक विराजमान आहेत.श्री गणेश कोशातील नोंदीनुसार राजा हंबीररावाच्या काळात म्हणजे सुमारे ८०० वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे. थोरले माधवराव पेशवे या मंदिरात येऊन गेले अशीही नोंद आहे. अनेक ठिकाणी श्री सिद्धिविनायकाची मंदिरे आहेत पण रिध्दी आणि सिध्दी यांच्यासह अखंड पाषाणात कोरलेल्या मूर्ती फार कमी आहेत. त्यापैकी ही एक मूर्ती. श्रींच्या गळ्यातील रुद्राक्षमाळा २७ नक्षत्रे तर उजव्या हातातील ९ मण्यांची माळ नवग्रह दर्शविते. मूर्ती साकारलेला मूळ पाषाण साडेतीन फूट उंच आणि अडीच फूट रुंद आणि आठ इंच जाड आहे. मूर्तीच्या वरच्या उजव्या हातात परशू, डाव्या हातात अंकुश, उजव्या पायाजवळ उंदीर व डाव्या पायाजवळील श्रीफळ भक्तांचे लक्ष वेधून घेते. डाव्या सोंडेच्या या विनायकाच्या तसेच रिध्दी - सिध्दीच्या बाजूला मखर कोरलेले आहे. मंदिरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्राचीन काळी हा भाग रानवड म्हणून प्रसिद्ध होता. या मंदिराच्या मागे कोरलेल्या शिलालेखात चंद्र, सूर्य व कलश यांच्या प्रतिमा आहेत. गुरुवार चैत्र अमावस्या शके ११८१, सिद्धार्थ सवंत्सर सन १२५९ अशी तिथी या शिलालेखावर आहे.रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात उरण हे गाव आहे. मुंबई आणि ठाणेकरांना या सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी एका दिवसात कारने तसेच मुंबईहून लाँचने मोरा बंदरापर्यंत जाऊन तेथून टांग्याने जाता येते. पनवेलहून एसटी बसनेही जाता येते. माघ महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात उत्सव होतो. बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी मंदिरातच राहण्याची सोय आहे. एका दिवसाच्या सहलीत या मंदिराशिवाय पाली आणि महडच्या गणपतीचे दर्शन करणेही ठाणे आणि मुंबईकरांना शक्य आहे.

विनायक (ता. उरण, जि. रायगड)