जिल्हा ठाणे:
जिल्हा रायगड:
अक्षद गणेश,
पारनाका, कल्याण (ठाणे)
साभार... (महाराष्ट्र टाइम्स)
गजबजलेल्या वातावरणातून दोन घटका शांतता हवी असल्यास बहुसंख्य कल्याणकर अक्षद गणेश मंदिरात जातात. भक्तांची अखंड रीघ, धूप उदबत्तीच्या सुवासामुळे मन प्रसन्न होते. ऐतिहासिक कल्याण नगरीची शान असलेल्या पारनाक्यावर पेशवेकालीन अक्षद गणपती आहे.या गणपती मंदिराची स्थापना २५० वर्षांपूर्वी पेशवाईत झाल्याची इतिहासात नोंद आहे. कल्याणातील प्रथम स्थानापन्न झालेला आणि मानाचा गणपती अशी या गणपती मंदिराची ओळख आहे. अक्षद म्हणजे शुभारंभ. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात अर्थात अक्षद म्हणूनच या गणपतीला अक्षद गणपती हे नाव देण्यात आले.कल्याणच्या पारनाका परिसरातील रहिवासी आपल्या कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आजही अक्षद गणपतीला अक्षद देत नमस्कार करून करतात.भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येणाऱ्या गणेशोत्सवात या मंदिरात फारसा जल्लोष नसला तरी माघी गणेशोत्सव मात्र मोठ्या भक्तिभावाने या मंदिरात साजरा केला जातो. तीन दिवस साजरा होणाऱ्या या उत्सवात गणपती जन्माचे कीर्तन, भजन, आणि वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. मंदिराची रचना पुरातन असून दीड फुट रुंदीच्या भिंती आणि मंदिराला लागून असलेला पोखरण तलाव यामुळे आजूबाजूला गजबजलेला परिसर असतानाही मंदिरातील शांत वातावरण भक्तांना आल्हाद देते. मंदिराचे कौलारू छत जुने झाल्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मात्र यावेळी भिंतीना कोणताही धक्का लावण्यात आलेला नाही. उंच चबुतऱ्यावर शेंदरी रंगात रंगविलेली थाटात विरजमान झालेली गणरायाची आकर्षक मूर्ती आहे. या मूर्तीवर पेशवाईची छाप नजरेस पडते.