जिल्हा ठाणे:
जिल्हा रायगड:
माहुलीच्या पायथ्याचा गणपती,
माहुली (ठाणे)
साभार... (महाराष्ट्र टाइम्स)
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माहुली किल्ला म्हणजे पर्यटक आणि ट्रेकर्सचं आवडतं ठिकाण. डोळ्यांचे पारणे फेडणारा निसर्ग आणि शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला, याव्यतिरिक्त माहुलीची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे गडाच्या पायथ्याशी विराजमान झालेला श्री महागणपती. छत्रपतीच्या वास्तव्याची साक्ष देणाऱ्या या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या परिसरातच हे मंदिर आहे. पेशवेकालीन काळात गावावरील अरिष्ट टाळण्यासाठी आणि सर्व विघ्नांचा संहार करण्यासाठी या गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली, असा उल्लेख एतिहासिक नोंदीमध्ये आहे. हे मंदिर उत्तराभिमुख आहे. शेंदराचे लिंपण असलेली महागणपतीची मूर्ती वेगळी आहे. ही मूर्ती २१ इंच आहे, गुडघ्यावर बसलेल्या अवस्थेत उजवा पाय आडवा दुमडलेला तर डावा पाय उभा दुमडलेला आहे. पण या गणपतीचा चार हातापैकी एक हात आशीर्वाद देताना, तर डावा हात गुडघ्यावर ठेवलेला आहे. त्यावर मोदक असून तो मोदक सोंडेने खाणारा हा गणपती आहे. मुळचे कौलारू असलेले हे मंदिर मोडकळीस आल्याने मंदिर देवस्थान समितीने मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे, मंदिराचे बाह्यरूप या जीर्णोध्दारात पालटले असले तरी मूळ मूर्ती आहे तशीच आहे. मंदिरात शंकराची पिंडही आहे. किल्ले माहुली हा चढाईसाठी मध्यम श्रेणीचा आहे. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड असे दुर्गत्रिकुट आहे. जिल्ह्यातील शहापूर जवळील माहुली गडाला ऐतिहासिक महत्त्व आहे. सन १६३५-३६ च्या सुमारास शहाजींनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून जुन्नर - शिवनेरीहून जिजाबाई व बाळ शिवाजीसह माहुलीला मुक्काम हलवला, अशी इतिहासात नोंद आहे. पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे २३ किल्ले मोगलांना दिले त्यापैकीच माहुली या किल्ल्याचाही समावेश होता. माहुलीगाव ते किल्लाचा पायथा या १० मिनिटांच्या रस्त्यात या गणेश मंदिरासह आणखी चार मंदिरे आहेत. ही मंदिरेही ऐतिहासिक आहेत. प्राचीन मारुती मंदिर, माहुलेश्वर (शिवमंदिर) आहे. या मंदिरातली नंदी आणि शिवलिंग प्राचीनतेची साक्ष देते. याखेरीज देवीचे मंदिर आहे.मध्य रेल्वेवरील आसनगाव स्थानकापासून चार किमी अंतरावर असलेल्या माहुली गडावर पोहचण्यासाठी रिक्षा अथवा परिवहन मंडळाच्या बसने जाता येते. या किल्ल्यावरून तानसा तलावाचे विहंगम दृश्यही दिसते, पावसाळ्यात धबधबेही स्वागताला असतात. वन डे पिकनिक आणि देवदर्शन असा दुहेरी योग साधता येऊ शकतो.

माहुली (ठाणे)