जिल्हा ठाणे:
जिल्हा रायगड:
श्री रामेश्वर देवस्थान,
चौल (जि. रायगड)
साभार... (महाराष्ट्र टाइम्स)

चौल (जि. रायगड)
निसर्ग सान्निध्यातील सुंदर मंदिर श्री रामेश्वर देवस्थान, चौल (जिल्हा रायगड), दर आरास... सजलेला मंडप आणि आसमंतात दरवळणारा सुगंध... हे वर्णन तंतोतंत लागू पडते रायगड जिल्ह्यातील चौल येथील प्रसिद्ध श्री रामेश्वर देवस्थानाला. चौल गावाचा इ.स. १३० पासूनचा इतिहास सापडत असला तरी हे अत्यंत विलोभनीय मंदिर नेमके कोणी बांधले याचा उल्लेख मात्र सापडत नाही. केवळ गणेशोत्सवातच नाही तर एरवीही या मंदिरात भाविकांची रेलचेल असते. याचे कारण देवळाप्रमाणे या मंदिरातील गणेशाची मूर्तीही वैशिष्ट्यपूर्ण आहे.श्री रामेश्वर देवस्थानाच्या या मंदिरातील मुख्य पिंडीच्या गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला गणरायांची प्रसन्न मूर्ती विराजमान आहे. मूर्ती तीन फुटांची असून ती चतुर्भूज आहे. उजव्या हातात एक परशू व दुसऱ्या हातात लाडू दिसतो. डाव्या बाजूच्या हातात शस्त्र असून दुसऱ्या हातात गणरायांचा आवडता प्रसाद, म्हणजेच मोदक आहे. विशेष म्हणजे हा मोदक सोंडेने खाण्याचा प्रयत्न गणपती करत असल्याचे या मुर्तिकाराने अतिशय कलात्मकरित्या दाखवले आहे. गणेशाच्या गळ्यात माळ व माथ्यावर सोनेरी मुकूट आहे.या मंदिरातील पिंडी स्वयंभू आहे. आजुबाजूच्या चार दीपमाळांनी या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर खुलून दिसतो. येथील चबुतऱ्यावरील तुळशी वृंदावनाजवळची दीपमाळ तर सन १६८९ मध्ये बांधली असूनही आजही ताकदीने उभी आहे. मंदिरानजिकच पाण्याची सोय असावी, या हेतूने त्याकाळीच तीन कुंडं बांधण्यात आली असावीत, असे जाणकार सांगतात. विष्णूसमोर पर्जन्यकुंड, गणपतीसमोर वायुकुंड आणि गाभाऱ्यासमोर मध्यभागी अग्निकुंड आहे. एरवी शहरांतील मंदिरांमध्ये फारसा पाहण्यास न मिळणारा नगारखाना या मंदिराच्या बाजूला आढळतो. हा नगारखाना इस १८१६ मध्ये बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. या मंदिरालगतचे आशापुरा मातेचे मंदिर इस १७८२मध्ये केरोबा महादेव साळवी यांनी उभारले.