जिल्हा ठाणे:
जिल्हा रायगड:
अंजूरचे ऐतिहासिक देवस्थान,
अंजूर (ता. भिवंडी, ठाणे)
साभार... (महाराष्ट्र टाइम्स)
भिवंडीपासून अगदी जवळ, हाकेच्या अंतरावर असलेल्या अंजूर गावात नाईकांची माडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुरातन वाड्यातच गणेशाचे ऐतिहासिक मंदिर आहे. तब्बल २८९ वर्षं जुने हे देवस्थान आहे. वाडा त्याहीपूर्वी सुमारे ६० वर्षं आधी बांधण्यात आला होता. उजव्या सोंडेचा हा श्री सिद्धिविनायक सुमारे ३०० वर्षं इथे विराजमान आहे. जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या सिद्धिविनायकाची मूर्ती अतिशय देखणी आहे. मूर्तीच्या भोवती फोल्डिंगचं लाकडी मखर करण्यात आलंय. हे मखरही ८५ वर्षं जुनं आहे. अंजूरसह आसपासच्या गावातील गावकरी अत्यंत श्रद्धेने या देवस्थानाला भेट देतात. माघात इथे गणेशजन्माचा मोठा उत्सव होतो. भाद्रपदात गौरी-गणपती असतात; तर नवरात्रात नऊ दिवसांचा उत्सव असतो.सिद्धिविनायकाची ही मूर्ती आणि वाड्याला, तसेच अंजूर गावालाही गौरवशाली इतिहास आहे. बिंब राजाच्या वंशजापैकी एका राजपुत्रास आणि त्याच्या आईस प्राणघातक संकटातून सरदार राणे यांनी वाचवले होते. त्यामुळे बिंब राजाने राणे घराण्याला ११६३ मध्ये हे गाव आणि नाईक ही मानाची पदवी दिली. १५८०च्या सुमारास साष्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या प्रांतात पोर्तुगिजांनी हैदोस घातला होता. त्या लढ्यादरम्यान १७१८ साली गंगाजी नाईक ईश्वरी अधिष्ठानासाठी मोरगावला गेले. २१ दिवसांच्या अनुष्ठानानंतर ते चिंचवडला गेले. तिथे संत श्री मोरया गोसावींच्या वंशजांनी गंगाजींना आपल्या पूजेतील श्री सिद्धिविनायकाची उजव्या सोंडेची मूर्ती भेट म्हणून दिली. याच मूर्तीची स्थापना त्यांनी अंजूर या गावी आपल्या वाड्यात केल्याची नोंद आहे.नाईक वाड्याच्या मागे दगडी बांधकाम केलेला तलाव आहे. तर काही अंतरावर खाडीला सुरुवात होते. भिवंडी बायपास महामार्गाच्या अत्यंत जवळ हे गाव असूनही गावात येणारा रस्ता अगदीच कच्चा आहे. ठाण्याहून इथे येण्यासाठी दिवसभरात आठ ते दहा बसगाड्या आहेत. ठाण्याहून आलिमघर इथे जाणाऱ्या बसगाड्या या गावातून जातात.

अंजूर (ता. भिवंडी, ठाणे)