top of page

श्री बाल दिगंबर गणेश,

कडाव (ता. कर्जत, जि. रायगड)

साभार... (महाराष्ट्र टाइम्स)

अत्यंत साध्या परंतु प्रशस्त अशा जीर्णोद्धार केलेल्या मंदिरातील शेंदूरचर्चित आसनमांडी घातलेली श्री गणेशाची मूर्ती पहाताक्षणी भक्त या मूर्तीच्या प्रेमात पडतात. कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर पाहण्यासाठी भक्त लांबून येत असतात. हे मंदिर बांधण्यासाठी पेशव्यांनी मदत केली असल्याचे त्यांच्या दफ्तरी नोंद आहे.या मंदिराला अनेक वर्षांचा इतिहास आहे, याची प्रचिती मंदिर फिरल्यानंतर काही क्षणातच येते. कण्वमुनी भारताची यात्रा करताना या गावामध्ये आले. ते श्री गणेशाचे उपासक असल्याने उपासनेत खंड पडू नये यासाठी बाल दिगंबर गणेशमूर्तीची स्थापना केली. हे मंदिर बांधण्यासाठी पार्वतीबाई पेशवे यांनी देखील मदत केली असल्याची इतिहासामध्ये नोंद आहे. प्राचीन काळातील जुनी बांधणी असलेल्या या मंदिराचा गाभारा जास्त मोठा नाही. पण गाभाऱ्यामधील गणेशाची मूर्ती मात्र बऱ्यापैकी मोठी असल्याने ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी खोदकाम करताना एका वीर पुरुषाच्या स्मारकाचे आणि सतीच्या स्मारकाचे अवशेष सापडले आहेत. या सर्व भग्न मूर्ती आजही मंदिराच्या आवारामध्ये पाहायला मिळतात.मंदिर एका छोट्याशा तलावाच्या काठावर असल्याने चमकणारे पाणी आणि सह्याद्रीची रांग मन प्रसन्न करून टाकते. अतिप्राचीन मंदिर असल्याने या बाल दिगंबर गणेशाचे दर्शन घेण्यासाठी बाराही महिने लांबून भक्त येत असतात. या बाल गणेशाचे दर्शन घेऊनच मग पुढे भीमाशंकरच्या दर्शनाला जात असल्याचे अनेक भक्त सांगतात.

© 2023 by NOMAD ON THE ROAD. Proudly created with Wix.com

  • b-facebook
  • Twitter Round
  • Instagram Black Round
bottom of page